औरंगाबाद – महानगर पालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी शुक्रवारी सायकलवरुन फेरफटका मारत शहराची पाहणी केली. आयुक्त रस्त्यावरुन फिरत असताना कोणीही त्यांना ओळखले नाही. काही ठिकाणी ट्रॅफिक सिग्नलवर ते सायकल घेऊन उभे देखील राहिले, मात्र मनपा आयुक्तांकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं देखील होती. सायकलिंगचा आनंद घेताना आयुक्तांनी शहराचीही बारकाईने पाहाणी केली.
औरंगाबाद महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. निपुण
विनायक यांनी आज (शुक्रवार) सुटीच्या निमित्ताने मुलांसोबत सायकलिंग केली.
मुलांसोबत टाईम स्पेंड करण्यासोबतच कर्तव्यदक्ष आयुक्तांनी शहराची पाहाणी देखील
केली. दिल्ली गेट येथील आयुक्तांच्या निवासस्थानापासून ते आणि त्यांची दोन मुले
सायकलिंग करत क्रांतीचौक, मोंढा नाका, आकाशवाणी ते सेव्हनहिल्स उड्डाणपुलापर्यंत
आले. येथून जकात नाका, रोशनगेट, चंपा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरुन ते
परत निवासस्थानी परतले. या संपूर्ण प्रवासात आयुक्तांना कोणीही ओळखले नाही. मात्र
सायकलिंग करताना शहरातील अनेक बारकावे त्यांनी टिपले असण्याची शक्यता आहे. जकात
नाका येथे साचलेल्या कचऱ्याकडे त्यांनी काहीवेळ थांबून नजर देखील टाकली.
सेव्हन हिल्स उड्डाणपुल येथे निपुण विनायक
आणि त्यांची मुलं ही ट्रॅफिकमध्ये अडकली. याठिकाणी त्यांनी सायकलवरुन उतरून पायी
चालणे पसंत केले. शहरातील ट्रॅफिक बरोबरच कुठे किती कचरा साचला आहे, याचे त्यांनी निरीक्षण केले. ‘सांजवार्ता’चे छायाचित्रकार मंगेश शिंदे यांनी त्यांच्याशी
बातचीत केली. ते म्हणाले, ‘सुटीनिमित्त मुले घरी आली आहेत. रोज कामाच्या
व्यापात मुलांना वेळ देणे शक्य होत नाही. आज गुरुनानक जयंतीनिमित्त सुटी
असल्यामुळे मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी सायकलिंग केले. त्यासोबतच शहराचीही पाहाणी
करता आली.’
शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, रस्त्यांची
दुरावस्था, मुलांसोबत सायकलिंगचा आनंद घेताना आयुक्तांच्या नजरेतून सुटली नसणार. यानंतर
आता आयुक्त काय कारवाई करतात हे पाहाणे महत्त्वाचे आहे.










